“हे दैवी अवतार म्हणजे जगात वसंतऋतूचे आगमन होय...कारण प्रत्येक वसंतऋतु म्हणजे नव निर्मितीचा काळ...”
— अब्दुल-बहा
बहाई धर्मश्रध्देची सुरुवात परमेश्वराने दोन दैवी प्रेषितांवर अवतरकार्य सोपवल्याने झाली–महात्मा बाब आणि अवतार बहाउल्लाह. आज, त्यांनी स्थापन केलेल्या धर्मश्रध्देची वैशिष्ठ्यपूर्ण एकता बहाउल्लाह ह्यांनी निःसंदेहपणे लिहून ठेवलेल्या आदेशांमुळे आहे, ज्यामुळे त्यांच्या निधनानंतरही त्यांचे मार्गदर्शन सतत सुरू राहाण्याची निश्चिती टिकून राहिली. उत्तराधिकाऱ्यांच्या या मालिकेला, करारनामा म्हणून संदर्भित केले गेले आहे. बहाउल्लाह यांच्याकडून त्यांचे सुपुत्र अब्दुल-बहा यांच्याकडे, आणि अब्दुल-बहांकडून त्यांचा नातू शोघी एफेंदी यांच्याकडे आणि त्यानंतर बहाउल्लाह यांनी आदेशित केलेल्या विश्व न्याय मंदिराकडे हे पद गेले आहे. बहाई श्रध्दावंत महात्मा बाब आणि बहाउल्लाह आणि तदनंतरच्या या नियुक्त वारसांचे हे दैवी अधिकारपद स्वीकारतात.
महात्मा बाब
महात्मा बाब हे बहाई धर्मश्रध्देचे अग्रदूत होत. १९व्या शतकाच्या मध्यावधी काळात त्यांनी जाहीर केले की मानवजातीच्या आध्यात्मिक जीवनात बदल घडवून आणणाऱ्या संदेशाचे ते धारणकर्ते आहेत. परमेश्वराकडून येणाऱ्या दुसऱ्या प्रेषिताच्या, जो त्यांच्यापेक्षा महानतम, आणि जो शांती व न्याय प्रस्थापित करणाऱ्या काळात येणार होता, त्याच्या येण्याच्या मार्गाची तयारी करण्याचा त्यांच्या अवतारकार्याचा हेतू होता.
बहाउल्लाह
अवतार बहाउल्लाह -“परमेश्वराचे वैभव”- हे महात्मा बाब आणि पूर्वीच्या दैवी अवतारांनी भाकित केलेले अभिवचित अवतार होत. बहाउल्लाह यांनी परमेश्वराकडून मानवजातीला आलेले नवीन प्रकटीकरण प्रसृत केले. त्यांच्या लेखणीतून हजारो वचने, पत्रिका, आणि ग्रंथ प्रकट झाले. त्यांच्या पवित्र लेखनातून त्यांनी जागतिक संस्कृतीच्या विकासासाठी एक रूपरेषा दर्शविली जी मानवी जीवनातील आध्यात्मिक आणि भौतिक परिमाणे दोन्ही विचारात घेते. यासाठी त्यांनी ४० वर्षे कारावास, छळ आणि हद्दपारी सहन केली.
अब्दुल-बहा
आपल्या मृत्युपत्रात बहाउल्लाह यांनी आपले ज्येष्ठ पुत्र अब्दुल-बहा यांना आपल्या शिकवणींचा अधिकृत विवरणकर्ता आणि धर्मश्रध्देचे प्रमुख म्हणून नियुक्त केले. संपूर्ण पूर्व व पश्चिमेत अब्दुल-बहा हे शांतीचे राजदूत, एक आदर्श व्यक्तिमत्व, आणि नव्या धर्मश्रध्देच्या आघाडीचे पुरस्कर्ते म्हणून प्रसिध्द झाले.
शोघी एफेंदी
अब्दुल-बहा यांनी आपला नातू शोघी एफेंदी यांना धर्मसंरक्षक नेमले. शोघी एफेंदी यांनी ३६ वर्षे व्यवस्थितपणे विकासाचे पालनपोषण केले, गहन ज्ञान गृहण केले आणि वाढत्या बहाई समुदायाचे ऐक्य बळकट केले, कारण तो समुदाय संपूर्ण मानवजातीच्या विविधतेचा प्रतिबिंब होता.
विश्व न्याय मंदिर
बहाई धर्मश्रध्देच्या जागतिक विकासाचे मार्गदर्शन आज विश्व न्याय मंदिर करते. आपल्या कायद्याच्या ग्रंथात बहाउल्लाह यांनी विश्व न्याय मंदिरास मानवजातीच्या कल्याणावर, शिक्षण, शांतता व जागतिक समृद्धी यांच्या विकासावर, आणि मानवी सन्मान व धर्माचे स्थान सुरक्षित करण्यावर सकारात्मक प्रभाव पाडण्याचा निर्देश दिला होता.