“प्रत्येक बालक हे संभाव्यतः जगाचा प्रकाश आहे – आणि त्याचबरोबर अंधःकार; म्हणूनच शिक्षणाचा प्रश्न हा सर्वात महत्वाचा गणला गेला पाहिजे”
— अब्दुलबहा
एक मुलांचा मोठा गट हसत खेळत गजबजलेल्या परिसरात रस्त्यावरून येतो. त्यांना दर आठवड्याला आध्यात्मिक गुण शिकवणाऱ्या तरुण मातेच्या घरी येतांना वाटेवरची पिवळी धमक रानफुले ती घेऊन येतात. आपल्या शिक्षिकेला उत्साहपूर्वक अभिवादन केल्यावर ती मुले एक चटई पसरतात आणि तिचा मध्यभाग फुलांनी सजवतात आणि मग लगेच प्रार्थनेसाठी शांत बसतात. नंतर ती पाठ केलेल्या अनेक प्रार्थना मोठ्या स्वच्छ आवाजात आणि एक सुरात म्हणतात. त्यानंतर त्यांची शिक्षिका त्यांना नवीन प्रार्थना शिकायला मदत करते. त्यानंतरचा कार्यक्रम म्हणजे गाणे म्हणणे आणि पवित्र लिखाणातील विश्वासार्हतेबद्दलच्या उताऱ्यांवर चर्चा करणे. मग हाच विश्वासार्हतेचा गुण दर्शवणारी एखादी गोष्ट ती मुलं लक्षपूर्वक ऐकतात. गोष्टीनंतर सहकार्यावर आधारित खेळ खेळतात आणि त्यानंतर त्यांनी शिकलेल्या उताऱ्यांसंबंधी चित्रे रंगवण्यात ती तल्लीन होतात.
सुरुवातीस मुलांना त्यांच्या वर्गाचा सूर सापडायला मदत करण्यात त्या शिक्षिकेला बरेच प्रयास पडतात, पण नंतर मात्र योग्य वर्तणुकीसाठी मुलांना शिस्तीचा बडगा दाखवण्याची तिला गरजच पडत नाही. आता वातावरण प्रेम, सहकार्य आणि परस्परावरील आदराने भारलेले असते आणि आध्यात्मिक जीवन म्हणजे काय याची खोल जाणीव त्यांना होऊ लागते. ती मुले जेव्हा आपल्या घरी जातात तेव्हा त्यांनी काढलेली चित्रे त्यांच्या कुटुंबियांसह सामायिक करतात. त्यांची दररोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना म्हणण्याची सवय चालू ठेवावी यासाठी आणि जमल्यास घरी प्रार्थनासभा नियोजित करण्यासाठीही पालकांना शिक्षिकेकडून प्रोत्साहन दिले जाते.
दर आठवड्याला भारतभर अशी हजारो दृष्ये दिसतात, ज्यामध्ये स्थानिक तरुण, स्त्री आणि पुरुष आपल्या घरात असे वर्ग घेतात, जिथे त्यांच्या परिसरातील मुलांना नैतिक आणि आध्यात्मिक शिक्षण मिळते. या वर्गांमध्ये केवळ चांगले काय आणि वाईट काय हे समजण्यावर भर न देता मनुष्याला आध्यात्मिक दृष्ट्या संपन्न करणाऱ्या संवयी, श्रध्दा, सद्वर्तन अशा गुणांची जोपासना करण्यावर भर दिला जातो. ही मुले जे शिकतात ते दृढ करण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रित कार्य करावे म्हणून अशा परिसरात किंवा गावात मोठ्या संख्येने ही जाणीव निर्माण व्हावी असे प्रयत्न केले जातात.