“मनुष्यास अमूल्य रत्नांनी भरलेली खाण समजा. केवळ शिक्षणानेच त्याची भांडारें प्रकट होऊ शकतात आणि त्यापासून मानवजात लाभ घेण्यास योग्य होऊ शकते.”
— बहाउल्लाह
मनुष्यजातीच्या सन्मानतेवर ठाम विश्वास असल्याने बहाई मित्रांना असे खात्रीपूर्वक वाटते की, समाजाच्या कल्याणासाठी प्रत्येक व्यक्तीमधील सुप्त गुणांची सुसूत्रपणे सतत जोपासना करणे आवश्यक आहे. शिक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीमधील सुप्त गूण प्रकर्षाने प्रकट होऊन समाजाचे उत्थान होऊ शकते. खऱ्या भरभराटीसाठी शिक्षण, आध्यात्मिक व भौतिक अशा दोन्ही स्तरावर दिले गेले पाहिजे.
बहाईंच्या समाज बांधणीच्या कार्यक्रमात शैक्षणिक कार्यक्रम केंद्रस्थानी आहेत. आयुष्यभर समाजाच्या भल्यासाठी काम करता यावे अशी आध्यात्मिक व बौध्दिक क्षमता वाढविणे हे या कार्यक्रमांचे उद्दिष्ट असते.
बालगट
मुलांच्या आध्यात्मिक शिक्षणाचे वर्ग विविध प्रकारे चालविले जातात ज्याद्वारे आध्यात्मिक गुणांची वाढ होईल व अशा श्रद्धा, संवयी आणि वर्तणूक यांना चालना मिळेल ज्यामुळे व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती होईल.
किशोरगट
आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि नैतिकतेच्या चौकटीत राहून निर्णय घेण्याची क्षमता वाठविण्यासाठी आयोजलेल्या कार्यक्रमात साऱ्या देशातील किशोरवयीन गट सहभागी होतात. त्यायोगे त्यांची अभिव्यक्ती वाढते आणि त्यांची प्रचंड उर्जा समाजसेवेकडे वळते.
तरुण व प्रौढ गट
विकेंद्रित शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे गावातील आणि शहरांच्या वेगवेगळ्या परिसरात तरुण व प्रौढ त्यांची बौध्दिक, नैतिक, आध्यात्मिक व व्यावहारिक क्षमता वाढवीत आहेत, ज्यायोगे ते आपल्या समाजाची सेवा करू शकतील.